मीरा जन्माला आली आणि त्याच दिवशी मी अगदी थकून गेले होते. शारीरिक थकवा होता, पण डोकं शांत नव्हतं. मनात एक वेगळीच भीती आणि नवी जबाबदारी.

त्या रात्री मी हॉस्पिटलच्या बेडवर झोपायचा प्रयत्न करत होते. माझ्या बाजूला मीरा, तिच्या छोट्याशा बॅसिनेटमध्ये शांत झोपलेली. आणि तिच्या शेजारी माझी आई — तिची आजी. तिच्या श्वासाचा हलकासा आवाज येत होता, पण झोप लागली नव्हती… मी सतत तिच्याकडे बघत होते — काहीतरी चुकत तर नाहीये ना? श्वास घेतेय ना व्यवस्थित? इतकी लहानशी, इतकी नाजूक… मनातला थकवा जाऊन एक वेगळीच काळजी आली होती — कारण मी आता आई झाले होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी दिनेश आला. त्या दिवशीही तशी गडबडच होती — मीराच्या सतराशे साठ टेस्ट्स, साफसफाई, फोटोथेरपी… तिला थोडा वेळ दुसऱ्या युनिटमध्येही नेलं. दिनेश तिच्या सोबतच गेला.

त्या रात्री दिनेशने ठरवलं, “आज मी इथेच राहतो.” आई-बाबा म्हणून, आपण दोघं मिळून तिची जबाबदारी कशी सांभाळतोय हे आम्हाला बघायचं होतं.

रात्रीचा वेळ म्हणजे जणू लर्निंग क्लास ‘बाळ सांभाळणं १०१’ असा कोर्सच! ह्या नव्या बाळासोबत सगळंच नवीन होतं.

छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्ही नर्सला बोलवत होतो — कसं swaddle करायचं? bottle कशी धरायची? आणि ती उचकी घेत होती… खूप वेळ! आम्हाला वाटलं काहीतरी चुकीचं होतं, घाबरलो दोघंही. पण नर्स म्हणाली, “It’s okay, completely normal.” पण तेव्हा ती “normal” गोष्टही मोठी वाटत होती.

तिसरा दिवस उजाडला — discharge चा दिवस. मीरा आज घरी येणार होती.

तिच्यासाठी घरून खास आणलेले छोटेसे कपडे काढले. एक छोटासा झबला, socks आणि टोपी. आम्ही नर्सला विचारलं, “तुम्ही घालून द्याल का?”

त्याऐवजी डॉक्टरच आल्या — हसत म्हणाल्या, “तुमचं बाळ आहे, आता ही सगळी कामं आता तुम्हालाच करायची आहेत!”

त्या क्षणी आम्ही दोघंही एकदम गोंधळलो. ती इतकी छोटी आणि नाजूक की तिच्या हातालाही आम्हाला स्पर्श करायला भीती वाटत होती. आम्ही एकमेकांकडे बघितलं आणि हळूच सुरुवात केली — झबला घातला, टोपी बसवली, डायपर लावला. कधी हसलो, कधी घाबरलो… पण शेवटी तिचा तो गोंडस चेहरा बघून मन एकदम भरून आलं.

मजा म्हणजे कारसीटच्या पट्ट्या लावताना हात प्रचंड थरथरत होते. एकदा सगळं झाल्यावर नर्स आली, फॉर्म्स दिले आणि आम्ही मीरासोबत लिफ्टमधून उतरलो.

हॉस्पिटलच्या त्या exit door मधून बाहेर येताना अचानक जाणवलं — आता आम्ही दोघं नव्हे, तर तिघं झालोय.

गाडीत बसताना एकमेकांकडे बघून हसलो… सुरुवात झाली होती —

एक नवीन आयुष्य, एका छोट्या जीवाबरोबर.