(मीरा)

डॉक्टरांनी २३ जुलै ही अंदाजे डिलिव्हरीची तारीख दिली होती. सगळं ठरवून झालं होतं — बॅग भरून ठेवलेली, घरात excitement, आणि मनात थोडी घालमेल. नावही आधीच ठरवलेलं — “मीरा”. गोड, शांत, आणि आपल्याला आतून भावणारं.

ती मात्र अजिबात घाईत नव्हती. दररोज वाटायचं, “आज जाईन का हॉस्पिटलला?” पण दिवस जात होते, आणि ती अजून पोटातच आरामात होती.

शेवटी २८ जुलैला डॉक्टरांनी सांगितलं, “चला, आता भरती होऊया.” रविवार होता.

गुड्डी आत्या आयर्लंडहून न्यू यॉर्कला पोहोचली होती. ती घरी आली आणि थोड्याच वेळात आम्हाला हॉस्पिटलला जायची वेळ आली. रात्री ८ वाजता मी आणि दिनेश, लक्ष्मण दादासोबत गाडीत बसलो. आई आणि गुड्डी खाली सोडायला आल्या. त्यांच्याही डोळ्यांत आनंद आणि काळजी दोन्ही दिसत होते.

हॉस्पिटल २०–२५ मिनिटांचं अंतर. गाडीत जाताना मनात खूप गोष्टी होत्या — सगळं सोपं जाईल, पटकन बाळ होईल आणि आम्ही परत घरी. पण जे वाटलं होतं, त्याच्यापेक्षा खूपच वेगळं घडलं.

हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यावर लगेच सलाईन, मॉनिटर, हातात , पाठीवर सुया लावले गेले. हालचालही करता येत नव्हती. एक मशीन सतत माझी आणि मीऱाची धडधड दाखवत होतं — बीप बीप आवाज काही थांबत नव्हता. रात्रभर झोप काही लागत नव्हती.

सकाळ झाली — २९ जुलै. मग ३० जुलै. तरीही मीरा काही बाहेर येण्याच्या तयारीत नव्हती.

डॉक्टरांनी ठरवलं — आता ऑपरेशन करावं लागेल.

ऑपरेशन थिएटरमध्ये सगळं थोडं थोडं घाबरवणारं होतं. डॉक्टर आपसात हसत, बोलत आपलं काम करत होते. मी डोळे मिटले आणि मनातल्या मनात म्हणायला लागले — “श्री स्वामी समर्थ”.

🌼 तो क्षण

आणि अचानक…

एक गोड रडण्याचा आवाज!

ते ऐकताच माझे डोळे भरून आले. मी स्वतःही रडायला लागले. ती आली होती! मीरा आली होती!

नर्सने तिला मला पहिल्यांदा दाखवलं — छोटुसं बाळ, थोडं जांभळट, आणि खूप गोंडस. ती रडत होती… पण त्या रडण्यातही एक वेगळंच गोडपण होतं.

थोड्या वेळाने, जेव्हा मला बाहेर आणलं, ती नीट साफ करून तयार केली होती. गोंडस पांढऱ्या कपड्यात बांधलेलं माझ बरिटो. डोळे मिटलेली — ती एकदम परी सारखी वाटत होती.

आणि मग, ती माझ्या छातीवर ठेवली.

त्या स्पर्शानं काळजाला अलगद हात लावला. ती माझ्यावर शांत झोपली होती.

तो क्षण… कधीही विसरता येणार नाही.

तिचा स्पर्श, तिचा थोडा गरम श्वास, तिच्या बोटांनी माझ्या हाताला हलकेच स्पर्श करणं — सगळं इतकं खास होतं की त्या क्षणी मी पूर्ण झाली असं वाटलं.

ती आली… आणि खरंच, सगळं बदलून गेलं.

Meera